Saturday, 27 July 2019

खेळ म्हणींचा

खेळ खेळू या म्हणींचा ।
शोध घेऊया त्यांतील अर्थाचा ।।
छोटीशी ओळ खूप सांगून जाते ।
म्हणून तर पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते।।
एक म्हण सांगते
करावे तसे भरावे ।
तर दुसरी सांगते,
मरावे परि किर्तीरूपी उरावे ।।
तिसरी तर म्हणते
सहन करू नका तोंड दाबून बुक्यांचा मार ।
चौथीचे सांगणे
नेहमीच असतो उथळ पाण्याला खळखळाट फार ।।
पाचवी समजावते
एका हाताने टाळी वाजत नाही ।
सहावी बोलते
काठी मारल्याने पानी दुभंगत नाही ।।
सातवी सतत टोकते
जलात राहुन माशांशी वैर करू नये ।
आठवी दटावते,चोर सोडून संन्याश्याला फाशी देऊ नये ।।
नववीचे म्हणणे,
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ।
दहावी तर म्हणते कावळ्याच्या शापाने काही गाय मरत नाही ।।
अकरावी गुरगुरते
उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नका ।
बारावी हळूवार बोलते
उतावळा नवरा होऊन गुडघ्याला बाशिंग बांधू नका ।।
ह्या तर फक्त बारा म्हणी
शोधल्यातर अजून कितीतरी सापडतील ।
कमी शब्दांत लपलेल्या खूप गोष्टी समजतील।।
जमेल तिथे म्हणींचा वापर करायला शिका ।
मराठीसाठी जगा आणि मराठीला जगवा।।
माय मराठीचा हा संदेश सर्वत्र पसरवा ।
तिचा मानाचा झेंडा उंच उंच फडकवा ।।



गीत यशाचे

           
स्वप्न पाहिलेच होते घवघवीत  यशाचे
आजचे हे यश आहे फळ मेहनतीचे
       वर्षभराचे कष्ट वर्षभराची धावपळ
       वर्षभरात झाली नुसती पळापळ
किती अधिक किती वजा
कधी बक्षीस कधी सजा
        जीवनातील चढ उतार जणू या वर्षभरात पाहिले
        निकाल हाती येताच सर्व भरून पावले
साकारले सर्वांचे स्वप्न, पडला अभिनंदनाचा पाऊस
ओघळले डोळ्यातून पाणी, आले गालावरती हासू
        उगवली नवी दिशा, अंकुरली नवी आशा
        वाट नवी आहे, पाऊल जपून टाका
अजून खूप काही शिकायचे आहे
अजून खूप पुढे जायचे आहे
नव्या विश्वाच्या् नव्या रंगात रंगूनही जायचे आहे
         नवे विश्व तर उभे आहे, तुमच्या स्वागतासाठी
        कायम महत्वाचे असाल तुम्ही, आमच्यासाठी
आमचा आशीर्वाद असाच राहिल, सदैव तुमच्या पाठीशी
पण एकनिष्ठ रहा, नेहमी आपल्या मातीशी
पुन्हा एकदा अभिनंदन, पुन्हा एकदा शुभेच्छा
ईश्वर पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा
ईश्वर पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा


             

मैत्री

   
बालपणातील आपली मैत्री दहावीनंतर सुटली
आयुष्याच्या या पर्वात न कळत पुन्हा जुळली
           खूप बोलावे असे वाटते पण शब्दच नाही मिळत
           कारण सुरूवात कुठून करायची हेच नाही कळत
या काळात खूप काही घडलं खूप काही सुटलं
भेटावेसे मात्र नेहमी मनातून वाटलं
            शब्दांच्या माध्यमातून आता रोज भेटतो
            मनातली ओढ शब्दांतून मांडतो
कधी रूसतो कधी रागवतो
या रुसण्या-फुगण्यात आपलं बालपणच शोधतो
            एकदा तरी भेटू अशी जागवतो मात्र उमेद
            खरंच आहे का आपल्याकडे आता एकमेकांसाठी वेळ
            खरंच आहे का आपल्याकडे  आता एकमेकांसाठी वेळ

माझी शाळा माझ्या आठवणीतील खजिना

माझी शाळा माझ्या आठवणीतील खजिना
कुठून करावी सुरुवात कळत नाही मला |
कारण माझ्या श्वासात आहे माझी शाळा  ||
       आईचा हात सोडूनि जेव्हा शाळेचा धरला हात |
       शाळेनेही आई बनुनि घेतले मज पदरात ||
हळूहळू एकेक इयत्ता चढत,  टाकीत गेले पाऊले |
संस्काराचे सर्व धडे, गिरवुनि तिने घेतले ||
       त्या वेळेचा एकेक क्षण मुरत गेला श्वासात |
       दिवस कधी सरले कळलेच नाही  मित्र-मैत्रिणींच्या सहवासात ||
खूप काही शिकले खूप खूप मिळवले |
त्यामुळेच तर आज अशी मी घडले ||
       तिच्या संस्कारांचा पगडा इतका मजवरी पडला |
       शिक्षिका बनुनि तिचा वारसा उचलला ||
अशी माझी शाळा जिने मला घडविले |
ज्ञानदानाचे कार्य मज कडूनही करविले ||
       माझी शाळा माझी आई तीच माझे अस्तित्व |
      माझ्या जीवनात आहे तिला श्वासाइतके महत्त्व ||
 तीच माझी शक्ती तीच माझी प्रेरणा  |
 ज्ञान दानाचे कार्य करूनि, वाटते माझ्या आठवणीतील अक्षय खजिना ||
     भरारी देईन तिने पाहिलेल्या स्वप्नांना |
     हीच असेल माझी तिला मानवंदना, हीच असेल माझी तिला मानवंदना ||
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझी तुझी माय मराठी

मी मराठी माझी मराठी
तू मराठी तुझी मराठी
माझी तुझी माय मराठी

शब्दांच्या खेळात रुळते मराठी
शब्दांच्या मोहात पडते मराठी
शब्दांच्या रंगात रंगते मराठी
माझी तुझी माय मराठी

शब्दांतून ओव्या गाते मराठी
शब्दांतून पोवाडे रचते मराठी
शब्दांतून नवरस पसरवते मराठी
माझी तुझी माय मराठी

शब्दांतील ओलाव्याने द्रवते मराठी
शब्दांतील प्रेमाने भुलते मराठी
शब्दांतील शस्त्राने लढते मराठी
माझी तुझी माय मराठी

शब्दांनी माणूसपण जपते मराठी
शब्दांनी आपलेपण आणते मराठी
शब्दांनी देवपण देते मराठी
माझी तुझी माय मराठी

शब्दाशब्दाने राष्ट्रप्रेम वाढवते मराठी
शब्दाशब्दाने जगाला जोडते मराठी
शब्दाशब्दाने सुंदर विश्व घडवते मराठी
माझी तुझी माय मराठी

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...